जगदाळे, गनबोटे कुटुंब अद्याप धक्क्यातच   

पुणे : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळे व कौस्तुभ गनबोटे यांचे प्राण गेले. एका क्षणात कुंटुंबीयांचा क्षणात आनंद हिरावला गेला. ही दोन्ही कुंटुंबे अद्यापही धक्क्यात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी या दोन्ही कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेताना त्यांना दिलासा दिला. 
 
पहलगामला पर्यटनासाठी गेलेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. यावेळी दोन्ही कुंटुंबीयांनी दहशतवाद्यांच्या थरार स्वत: अनुभवला आहे. त्या धक्क्यातून ही कुंटुंबे अद्याप सावरली नाहीत. शहर व परिसरातील अनेक जण जगदाळे आणि गनबोटे कुंटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत आहेत. त्यात राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांचाही समावेश आहे. त्यामुळे जगदाळे आणि गनबोटे यांच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुटुंबीयांच्या तोंडून हल्ल्याचा थरार ऐकणार्‍यांचे मन पिवळवटून जात आहे. तर, दोन्ही कुंटुंबात स्मशान शांतता पाहण्यास मिळत आहे. 
 
डोळ्यादेखत पतीची हत्या 
 
दहशतवाद्यांनी सर्व पुरूषांना अजान म्हणायला लावले. त्यानंतर त्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात मला माझा पती गमवावा लागला. माझ्या डोळ्यादेखत दहशतवाद्यांनी पतीला ठार मारले, असे कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नीने मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले.  
 
वडील कोसळताच मी ही कोसळले... 
 
आम्ही फोटो काढत असताना अचानक गोळीबार सुरू झाला. सर्वत्र एकच गोंधळ उडाला, आम्ही टेंटमध्ये लपलो. गनबोटे काका खाली झोपले होते. एकजण आमच्याकडे आला. त्याने पुरूषांना गोळ्या मारायला सुरुवात केली. माझ्या वडिलांना ३ गोळ्या लागल्या. माझे वडील जागेवर पडले, काकांना देखील दोन गोळ्या लागल्या. वडिलांना गोळ्या लागल्याने ते कोसळले. त्यांना पाहून मी ही चक्कर येऊन कोसळले. स्थानिकांनी भरपूर मदत केली. त्यानंतर लष्कराचे जवान पोेहचले. जखमींना श्रीनगरला नेण्यात आले. रात्री १२ वाजता कळले की, काही जणांचा मृत्यू झाला. आम्हाला ओळख पटविण्यासाठी नेण्यात आले. मला तेव्हा कळले की, बाबांचा आणि काकांचा मृत्यू झाला, असेे असावरी जगदाळे हिने मुख्यमंत्र्यांना सांगितले. 
 
पीडित कुटुंबीयांना भेटून निशब्द झालो
 
कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुंटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी पहलगाममधील सांगितलेला थरार ऐकून निशब्द झालो. असावरी यांनी घटनास्थळावरील सांगितलेला थरार ऐकून मन हेलावून गेले. गनबोटे, जगदाळे कुटुंबासोबत जे झाले ते अनाकलनीय आहे. या घटनेमुळे दहशतवाद्यांशी लढण्याचा निर्धार अधिक घट्ट झाला आहे. या दोन्ही कुटुंबामागे राज्य सरकार आहे. त्यांना लागेल ती मदत करण्यास सरकार तयार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Related Articles